अहमदनगर लाच मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तेथे त्यांना दिलासा मिळाला आहे. बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवाना देण्यासाठी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे व त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती तेव्हापासून जावळे व देशपांडे दोघेही फरार होते.

या दरम्यान जावळे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्यानंतर जावळे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली त्यावर नुकतीच सुनावणी होऊन जावळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील दुसरा आरोपी श्रीधर देशपांडे हा अद्याप फरार आहे. त्याचाही अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळलेला असल्याने आता तोही खंडपीठात दाद मागण्याची शक्यता आहे.
