उमरखेड :
तालुक्यात २३,ते २५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या आवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी पिके अक्षरशः जमिनीवर कोसळून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे उमरखेड च्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत, 27 फेब्रुवारीला निवेदन देत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

उमरखेड तालुक्यातील विविध भागांत अवकाळी पावसासोबत जोरदार वारे व गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा , ज्वारी, मका, केळी, फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः जंगल भागातील इसापूर, निंगणूर, खरबी आदी गावांमध्ये गारपिटीने पिके अक्षरशः मातीत मिसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुळावा, पोफाळी, मतखंड भागात अवकाळी च्या थैमानाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे पुढे आले आहे.
शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे आडवे पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करावेत व बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५०,००० रुपयांची मदत तात्काळ जाहीर करावी, अशी ठाम मागणी, काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, मागील पावसाळ्यातील पुर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सानुग्रह अनुदान व पीकविमा अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने ती तात्काळ शासनाने द्यावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाने केली आहे. शासनाने विलंब न करता प्रलंबित मदत तातडीने वितरित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टिकर, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, तसेच उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांनाही देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर काँग्रेसचे नेते राम देवसरकर, कल्याण राणे, गणेश बेले, रामदास कदम यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. तर निवेदन देताना युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण, प्रभाकर कदम, गौतम दवणे, गजानन भारती, आदि पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील शेतकरी वर्गात प्रचंड चिंतेचे वातावरण असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *