उमरखेड शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तब्बल २५० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या संथ कामावरून भाजप नेते नितीनभाऊ भूतडा यांनी प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीला चांगलेच धारेवर धरले. दिवाळीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची कडक सूचना त्यांनी दिली आहे.

HAM योजनेअंतर्गत हरदडा-उमरखेड-पुसद या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पासाठी तब्बल २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजप नेते नितीनभाऊ भूतडा आणि माजी आमदार नामदेवराव ससाणे यांनी दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्प मंजूर करून आणला होता.

मात्र, सध्या उमरखेड शहरातील या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी, मध्यम व लघु व्यावसायिक, शहरातील नागरिक, तसेच बाहेरगावाहून ये-जा करणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर २९ ऑक्टोबर २०२६ रोजी उमरखेड येथील एसडीओ कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार किसनराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी मुळे, उमरखेड आणि महागावचे दोन्ही तहसीलदार, HAM योजनेचे अधिकारी तसेच कंत्राटदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत भाजप नेते नितीनभाऊ भूतडा यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींना कामातील दिरंगाईवरून चांगलेच धारेवर धरले.

कंत्राटदार कंपनीला थेट टर्मिनेट करण्याच्या सूचना!

यावेळी MSRDC च्या कार्यकारी अभियंता मेश्राम मॅडम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. उमरखेड शहरातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या आणि कामाला गती न देणाऱ्या कंत्राटदार कंपनीने विहित मुदतीत काम पूर्ण केले नाही, तर संबंधित कंपनीला तात्काळ टर्मिनेट करण्याच्या सूचनाही नितीनभाऊ भूतडा यांनी दिल्या.

दिवाळीपूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याची तंबी!

भारतीय संस्कृतीतील प्रमुख सण असलेला दिवाळी उत्सव ८ नोव्हेंबर रोजी असल्याने त्यापूर्वी उमरखेड शहरातील मुख्य रस्त्याचे काम डागडुजीसह पूर्ण झाले पाहिजे, अशी स्पष्ट तंबी त्यांनी कंत्राटदार कंपनीला दिली.

दरम्यान, या बैठकीनंतर उमरखेड शहरातील रस्त्याच्या कामाला गती मिळणार का आणि नागरिकांची धुळीच्या त्रासातून सुटका होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ढानकी-उमरखेड-पुसद मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन रस्ते निर्मितीचे काम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *