यावल पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेले धरणे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने विविध मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. किनगाव प्रकरणासह माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधातील तक्रारीचीही चौकशी करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

यावल पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेले धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले होते.

दरम्यान, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या वतीने आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देण्यात आले. या पत्रात किनगाव येथील घटनेचा तपास, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधातील तक्रारीची चौकशी, कायदा व सुव्यवस्था आणि गावातील शांतता प्रस्थापित करण्याबाबत महत्त्वाची आश्वासने देण्यात आली आहेत.

किनगाव प्रकरणातील FIR क्रमांक 390/2026 चा पुराव्यांच्या आधारे तपास!

किनगाव येथील घटनेप्रकरणी दाखल असलेल्या FIR क्रमांक 390/2026 मधील नामनिर्दिष्ट आरोपींची व्हिडिओ फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

तसेच पंचमंडळासमक्ष संबंधित व्यक्तींना समोरासमोर बसवून त्यांचा या प्रकरणातील सहभाग तपासण्यात येणार आहे. तपासाअंती जे निर्दोष आढळतील, त्यांच्याबाबत नियमानुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय अटक करण्यात आलेल्या आरोपींची निर्धारित कालमर्यादेत चौकशी करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

किरीट सोमय्या यांच्यावरील तक्रारीचीही चौकशी!

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीचीही चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गावातील शांतता प्रस्थापित करण्याबाबतही पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे.

पोलीस प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. आता दिलेल्या आश्वासनांची पोलीस प्रशासनाकडून कितपत पूर्तता होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *