भुसावळ-यावल मार्गावरील अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकीचा अचानक टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात एका नवविवाहित अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, धोकादायक वळणावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-यावल मार्गावर अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर दुचाकीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात शुभम दिनकर पाटील या ३० वर्षीय तरुण अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास विरावली, तालुका यावल येथील मूळ रहिवासी आणि सध्या पांडुरंग सराफ नगर, यावल येथे राहणारा शुभम दिनकर पाटील हा आपल्या एमएच १९ डीएन २८०९ क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळहून यावलच्या दिशेने येत होता.
दरम्यान, अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर अचानक त्याच्या दुचाकीचा टायर फुटला. त्यामुळे भीषण अपघात होऊन शुभम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
शुभमच्या अपघाती मृत्यूची बातमी त्याच्या मूळ गावी पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. शुभम हा पाटील कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. नवविवाहित शुभमच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुभमच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खबर देण्यात आल्याने अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोर नदीच्या पुलावरील धोकादायक वळण; अपघात कधी थांबणार?
दरम्यान, भुसावळ-यावल मार्गावरील अंजाळे गावाजवळ मोर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या धोकादायक वळणावर यापूर्वीही अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पुलावरील वळणाचा भाग चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मात्र, या पुलावरील अपघातांच्या घटना थांबणार तरी कधी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत असून, आणखी किती जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासन या धोकादायक वळणाकडे लक्ष देणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
