कोल्हापूर | जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कौलगे येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षापूर्वी मयत तरुणाने आरोपीच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. याचाच राग मनात धरून ही हत्या करण्यात आली. स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत खडकेवाडा हद्दीमध्ये आढळून आला. या घटनेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलिसांनी आशुतोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील (वय २५, रा. कौलगे) व सागर संभाजी चव्हाण (रा. नानीबाई चिखली) यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील एका खाजगी कंपनीत काम करत होता. स्वप्नीलच्या वडिलांनी १५ जानेवारीला तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह खडकेवाडा येथे आढळून आला. मयत स्वप्नील पाटील आणि आरोपी आशुतोषचे गावामध्ये घर लागूनच आहेत. स्वप्नीलने वर्षभरापूर्वी आशुतोषच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. त्यावेळी गावपातळीवर हे प्रकरण मिटवण्यात आले होते. मात्र, आशुतोषच्या मनात राग कायम होता. त्यामुळे १५ जानेवारीच्या रात्री स्वप्नील, आशुतोष आणि सागर चव्हाण एकत्र फिरत होते, अशी माहिती मिळाल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. स्वप्नीलचा खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वप्नीलच्या चेहऱ्याचा दगडाने चेंदामेंदा केला. तसेच त्याच्या गाडीमधील पेट्रोल काढून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने आरोपींचा डाव फसला आणि त्यांचा भांडाफोड झाला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.

#kolhapurmurdercase

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *