मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची घटनास्थळी भेट
अहिल्यानगर :– अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मिरी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.किसनाबाई छगन मैदड (वय ७५ वर्षे) या वृद्ध महिलेची हत्या करून तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती उघडीस आली आहे.ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,शेवगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील,पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,सहाय्यक निरीक्षक नितीन दराडे,पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव,हरीश भोये,पोलिस कॉन्स्टेबल भगवान टकले,अमोल बुचकुल,संभाजी कुसळकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवमन वाघ आणि त्यांची टीम,फॉरेन्सिक पथकाचे ठसे तज्ज्ञ रशीद शेख,श्वानपथक असा मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.पोलीस अधिकाऱ्यांनी
घटनास्थळी पहाणी केली असता मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला आहे की,पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला असावा.विशेष बाब म्हणजे,घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.त्यामुळे वृद्ध महिलेच्या हत्येच्या मागचे नेमके कारण काय याचा शोध पोलिस घेत आहेत.किसनाबाई यांना एक मुलगी असून दोन नातवंडे सचिन आणि चेतन आहेत.त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्यासह पाथर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहिल्यानगर.मो.नं.9373489851.