- स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; तरुण पिढी दिशाहीन होण्याची भीती..!
बारामती, पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या एका अत्यंत गंभीर आणि अनैतिक व्यवसायामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदरसह बारामती व दौंड तालुक्यात काही परप्रांतीय एजंटामार्फत वेश्या व्यवसायाचे मोठे रॅकेट सुरू असून, या माध्यमातून दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे, बंद पडलेल्या लॉजिंग व हॉटेल्सचा वापर या बेकायदेशीर धंद्यासाठी केला जात आहे.
ग्रामीण भागात व्यवसायाचा प्रसार
अनेक वर्षे शहरी भागापुरता मर्यादित असलेला हा अनैतिक व्यवसाय आता ग्रामीण भागात वाढीस लागला आहे.
- पुरंदर तालुका: जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर्डे फाट्यावरील जुन्या लॉजिंग व हॉटेल येथे परप्रांतीय व्यक्तींकडून आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातील महिलांमार्फत हा व्यवसाय सुरू आहे.
- दौंड तालुका: सुपा-चौफुला रोडवरील देऊळगाव गाडा या गावच्या हद्दीत एका परमिट रूम व लॉजिंग ठिकाणीही हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे.
- कार्यपद्धती: आंबट शौकीन यासाठी दररोज हजारो रुपये खर्च करत आहेत. मोबाईलवरील ‘व्हॉट्सअप’ माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध असलेल्या महिलांचे फोटो पाठवले जातात. तसेच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संकेतिक खुणांचा वापर केला जातो.
स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या गैरव्यवसायाची माहिती जेजुरी पोलीस स्टेशन तसेच यवत पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना माहीत असूनही याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केरळ राज्यातील काही गुन्हेगार स्थानिक लोकांना हाताशी धरून आर्थिक प्रलोभन देत परराज्यातील मुलींना या व्यवसायात सक्रिय करत आहेत. जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या लगत असलेली बहुतांश लॉजिंग व हॉटेल या व्यवसायासाठी कार्यरत आहेत. अल्पावधीत हजारो रुपये मिळत असल्याने या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
तरुण पिढीवर विपरीत परिणाम
या अनोख्या गैरव्यवसामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी दिशाहीन होत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण बेकायदेशीर आणि अनैतिक पद्धतीने सुरू असलेल्या या धंद्याकडे तरुण आकर्षित होत असल्याने जाणकार लोकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. याला वेळीच आवर न घातल्यास ग्रामीण भागात विपरीत परिणाम होतील, अशी भीती व्यक्त करून जनतेकडून पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रतिनिधी मनोहर तावरे,
एनटीव्ही न्यूज मराठी, बारामती, पुणे.
