- महाराष्ट्र संघाची ऐतिहासिक कामगिरी; अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशचा ४–१ असा दणदणीत पराभव..!

नागपूर, (दि. १९ डिसेंबर २०२५)
नागपूर: सावनेर–कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील इसापूर येथील होतकरू फुटबॉलपटू शर्वरी फाले हिने क्रीडा क्षेत्रात सावनेर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. ज्युनियर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप २०२५–२६ मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत तिने विजेतेपद पटकावल्याबद्दल तिचा नुकताच गौरव करण्यात आला.
अंतिम सामन्यातील दणदणीत विजय
दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी नागालँड येथील चुमोकेदिमा फुटबॉल स्टेडियम येथे या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघाचा ४–१ असा पराभव करत राष्ट्रीय अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या विजयी संघात सावनेर तालुक्यातील इसापूर येथील शर्वरी फाले हिचा समावेश असणे, ही मतदारसंघासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
जननेत्याकडून कौतुकाची थाप
शर्वरीच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी तिचा यथोचित सत्कार केला. आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन शर्वरीचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. देशमुख यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “शर्वरीने भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट फुटबॉलपटू व्हावे,” अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शर्वरीच्या या यशाबद्दल संपूर्ण सावनेर तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी मंगेश उराडे,
एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर.
