नागपूर: ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर गांभीर्याने काम करत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कनियाडोल (कोकर्डा) ग्रामपंचायतीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ आणि ‘माझी वसुंधरा टप्पा-६ (२०२५-२६)’ अंतर्गत ग्रामपंचायतीने गावातील ७२ किशोरवयीन मुलींना वर्षभर मोफत उच्च दर्जाचे सॅनेटरी पॅड्स घरपोच देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
१० टक्के महिला व बालकल्याण निधीचा विनियोग
अनेकदा ग्रामपंचायतींमध्ये महिला व बालकल्याण निधी अखर्चित राहतो किंवा इतर कामांकडे वळवला जातो. मात्र, कनियाडोल ग्रामपंचायतीने आपल्या सामान्य निधीतील १० टक्के महिला व बालकल्याण निधी या आरोग्यदायी उपक्रमासाठी राखून ठेवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांपासून या योजनेची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून मुलींना नियमितपणे पॅड्सचा पुरवठा केला जात आहे.
आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी
या उपक्रमात पारदर्शकता आणि सातत्य राहावे यासाठी गावातील आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांची मदत घेतली जात आहे. त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष घराघरात जाऊन सॅनेटरी पॅड्सचे वाटप केले जाते. यामुळे केवळ पॅड्सचे वाटपच होत नाही, तर आरोग्याबाबत वैयक्तिक संवाद साधल्याने मुलींमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकताही निर्माण होत आहे.
‘या’ नेतृत्वाचा पुढाकार
ग्रामपंचायतीचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खालील पदाधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे:
- लालमोहम्मद सरदार मालाधारी (सरपंच)
- संगीता संजय बोरकर (उपसरपंच)
- सरोजिनी गावंडे (ग्रामसेवक)
“ग्रामीण भागात आजही मासिक पाळी आणि सॅनेटरी पॅड्सबाबत मोकळेपणाने बोलले जात नाही. कनियाडोल ग्रामपंचायतीचा हा पुढाकार केवळ आरोग्याशी संबंधित नसून तो महिलांच्या सन्मानाचा आणि सक्षमीकरणाचा भाग आहे.” – सरपंच लालमोहम्मद मालाधारी
इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी पाऊल
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा मूळ उद्देश गावाला स्वयंपूर्ण आणि आरोग्यदृष्ट्या समृद्ध करणे हाच आहे. कनियाडोल (कोकर्डा) ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. याशिवाय, ग्रामपंचायत कनियाडोलमार्फत नागरिकांच्या हितासाठी इतरही विविध लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.
वृत्त संकलन: मंगेश उराडे (NTV न्यूज मराठी, नागपूर जिल्हा)
