- राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कारांनी रेपाळा गाव उजळले..!

जालना प्रतिनिधी | दि. १३ जानेवारी
जालना: जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमदान शिबिराचा समारोप दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी मौजे रेपाळा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजसेवा, श्रमप्रतिष्ठा व सामाजिक बांधिलकीचा जागर या सात दिवसांच्या शिबिरातून अनुभवास आला.
या विशेष श्रमदान शिबिराचे उद्घाटन दि. ७ जानेवारी २०२६ रोजी मौजे रेपाळा येथे सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोड शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव प्रा. डॉ. राहुलभाऊ म्हस्के हे उपस्थित होते.
शिबिराच्या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ग्रामस्वच्छता, शिवार फेरी, मतदान जनजागृती रॅली, ग्रामस्थांचे आरोग्य शिबिर, गावाचा आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण, पशुवैद्यकीय तपासणी, व्यसनमुक्तीची शपथ, समाजप्रबोधनपर कीर्तन आदी उपक्रमांमुळे संपूर्ण गावात सामाजिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले.
सांस्कृतिक संध्येमध्ये प्रॉ. डॉ. अनिल मगर यांच्या प्रभावी भारुड कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच धामणा नदीच्या उगमस्थानाविषयी माहिती, पर्यावरण व जलसंवर्धन विषयक मार्गदर्शनाने स्वयंसेवकांमध्ये निसर्गप्रेम जागवले.
बौद्धिक सत्रांमध्ये जलसंवर्धन व पर्यावरण संवर्धन, हवामान बदल – कारणे व उपाय, कॉम्पोस्ट व पाझर खड्डे निर्मितीचे प्रशिक्षण, बालविवाह – एक सामाजिक समस्या, लोकशाही भारताचे संविधान, तसेच कवी संमेलन व नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. सतीश जाधव हे उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा व नेतृत्वगुण विकसित होतात,” असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांनी, “राष्ट्रीय सेवा योजना हा केवळ उपक्रम नसून ती एक विचारसरणी, जीवनशैली आणि स्वतःचा विकास साधत समाज उन्नत करण्याची सुवर्णसंधी आहे. आजच्या युगात केवळ बुद्धिमत्ता नव्हे तर सामाजिक संवेदनशीलताही महत्त्वाची आहे,” असे विचार मांडले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री. गणेश शेळके, उपसरपंच सौ. पल्लवी दिलीप देवडे, श्री. गणेश सपकाळ, डॉ. पी. जी. देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. सुनील मेढे, उपप्राचार्य श्याम सर्जे, उपप्राचार्य विनोद हिवराळे, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ शिवाजी जगतवाड, प्रा. डॉ प्रदीप मिसाळ, सौ. सरिता मणियार व प्रा. मनिष बनकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. समारोपप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष श्रमदान शिबिरामुळे मौजे रेपाळा परिसरात स्वच्छता, सामाजिक कार्य व पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले, असे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
प्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद, जालना.
