- धोत्रा नंदाई शिवारात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..!
- तब्बल ४४ लाखांची १.११ क्विंटल अफूची झाडे जप्त..!

देऊळगाव राजा | दिनांक: ३१ मार्च २०२६
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदाई शिवारात कांद्याच्या पिकात आंतरपीक म्हणून बेकायदेशीररीत्या लावलेली अफूची शेती स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४४ लाख ५३ हजार २०० रुपयांची अफूची झाडे जप्त केली असून, एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
कांद्याच्या आडून अंमली पदार्थांची लागवड
अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धोत्रा नंदाई शिवारात ही कारवाई करण्यात आली. कोणालाही शंका येऊ नये म्हणून आरोपीने कांद्याच्या बियाण्यांच्या पिकात अत्यंत शिताफीने अफूची झाडे लावली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेला याची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी शेतावर धाड टाकली.

आरोपी आणि जप्त मुद्देमाल
या प्रकरणी पोलिसांनी संजय तुकाराम चेके (रा. सरंबा, ता. देऊळगाव राजा) याला अटक केली आहे.
- जप्त मुद्देमाल: १११ किलो ३३ ग्रॅम वजनाची ओलसर अफूची बोंडे असलेली झाडे.
- एकूण किंमत: ४४ लाख ५३ हजार २०० रुपये.

पोलिसांत गुन्हा दाखल
आरोपीने विनापरवाना अफूची लागवड, संगोपन आणि साठवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८(क) आणि १८(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत.
जिल्ह्यात अशा प्रकारे लपून-छपून अंमली पदार्थांची शेती केली जात असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्त संकलन: विशेष प्रतिनिधी, देऊळगाव राजा, बुलढाणा.
