- मध्य प्रदेश सीमेलगत केळवद परिसरात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची अचानक झाडाझडती.
- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस खते आणि औषधी विक्री रोखण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर.
- पाणीटंचाई निवारण कामांची पाहणी करून सिंचन व्यवस्था सक्षम करण्याचे प्रशासनाचे निर्देश.
- शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा.
NAGPUR : सावनेर तालुक्यात खरीप हंगामाच्या तोंडावर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, केळवद परिसरात बोगस खत आणि औषधी विक्रेत्यांविरुद्ध उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सावनेर येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि कृषी निविष्ठांचा दर्जा राखण्यासाठी सावनेर प्रशासनाचे अधिकारी आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या केळवद परिसरात गुरुवारी अचानक उपविभागीय अधिकारी मोटवानी आणि तहसीलदार अक्षय पोयाम यांनी ‘फिल्ड व्हिझिट’ करत कृषी केंद्रांची झाडाझडती घेतली. प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या बोगस खतविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
या भेटीदरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई निवारण कामांची पाहणी केली आणि सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने निर्देश दिले. प्रशासनाचे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याला प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केळवद हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेलगत असल्याने यापूर्वी येथे बोगस बियाणे आणि रासायनिक खतांच्या शिरकावाच्या तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब गांभीर्याने घेत दोन्ही अधिकाऱ्यांनी स्थानिक कृषी केंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. रासायनिक खतांचा उपलब्ध साठा आणि प्रत्यक्ष विक्रीचा ताळमेळ तपासणे, बोगस निविष्ठांची विक्री रोखण्यासाठी तांत्रिक पडताळणी करणे आणि खतांची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.
तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केंद्र चालकांना ताकीद दिली की, शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये आणि त्यांची आर्थिक लूट होऊ नये. “दर्जेदार कृषी निविष्ठा मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच पाणीटंचाईच्या काळात प्रत्येक नागरिकाला दिलासा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी नमूद केले. नियमांचे उल्लंघन किंवा त्रुटी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. या दौऱ्यात स्थानिक ग्रामस्थांनी पाणंद रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाच्या अडचणी मांडल्या, ज्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
मंगेश उराडे, नागपूर.
