जामखेड तालुक्यात रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेल्याने शेतकरी हवालदील.
समाधानकारक पावसाअभावी बाजरी, मूग आणि सोयाबीनचे पेरणी नियोजन पूर्णपणे कोलमडले.
जूनचा अर्धा महिना संपल्याने आता संपूर्ण भिस्त २२ जूनला लागणाऱ्या आर्द्रा नक्षत्रावर.
महागडी बियाणे, खतांचे दर आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची चिंता दुणावली.
AHILYANAGAR | रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रही संपत आले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने जामखेड तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या पावसाअभावी बाजरी, मूग आणि सोयाबीनच्या पेरण्या धोक्यात आल्या असून बळीराजासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
मान्सून वेळेत दाखल होईल आणि पेरण्यांना वेग येईल या आशेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून खरीप हंगामाची तयारी केली होती. मात्र जूनचा अर्धा महिना संपला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. बळीराजा दररोज आकाशाकडे अपेक्षित नजरेने पाहत असून आता संपूर्ण भिस्त ही आर्द्रा नक्षत्रावर अवलंबून आहे. ८ जून रोजी लागलेले मृग नक्षत्र कोरडेच गेले आहे. आता २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्र लागत असून या नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्याचे सर्व आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात नान्नज येथील शेतकरी राजेंद्र अनंता मोहळकर यांनी सांगितले की, “बळीराजा पाऊस, दुष्काळ, वादळ अशा संकटांशी नेहमीच लढत असतो. तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा कायमच फटका बसतो. आगामी नक्षत्रात पाऊस झाला नाही तर पिकांचे आणि आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.”
खरीप हंगामातील पेरण्या वेळेत होणे गरजेचे असते. पाऊस लांबल्यास खरीपाबाबत साशंकता निर्माण होईल. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतांशी भागात मुगाची तसेच बाजरी आणि सोयाबीनची पेरणी उरकली जाते. परंतु वरुणराजाने हुलकावणी दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. आर्द्रा नक्षत्रातही पाऊस न झाल्यास मूग पेरणीचे नियोजन कोलमडण्याची भीती आहे. उशिरा पेरणी झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आणि त्यातच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे आणि खतांच्या दरांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी पावसाची दडी अधिकच चिंताजनक ठरत आहे.
प्रतिनिधी : नंदु परदेशी
