एल निनोच्या प्रभावामुळे आणि कमी पावसाच्या शक्यतेने राज्यातील सर्व धरणांमधील पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश.


३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी बेकायदा पाणी उपशावर होणार कडक कारवाई.


महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत धरणे, कालवे आणि नद्यांवर घातली जाणार गस्त.


पाणीसाठा आणि केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक.

AHILYANAGAR | भारतीय हवामान विभागाने यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची आणि पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धरणे, जलाशय आणि जलस्रोतांमधील पाणीसाठा संरक्षित करून सध्या सुरू असलेली पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
voice:
शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व जिल्हाधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणीसाठ्याचा तत्काळ आढावा घ्यावा. अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा वापर इतर कारणांसाठी करू नये. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व शहरी आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील, यासाठी पाणीसाठा जपून वापरण्याबाबत जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्या आहेत.
धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांमार्फत गस्त घातली जाईल. अनधिकृत मोटारी, पाईपलाईन आणि पंपांची तपासणी करून १२ डिसेंबर २०१8 च्या शासन निर्णयानुसार कारवाईचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्थगित केलेली सिंचन आवर्तने आणि बेकायदेशीर पाणी उपशावर केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचना सर्व विभागीय आयुक्त, पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


प्रतिनिधी : नंदु परदेशी , अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *