दिवाळीच्या तोंडावर कासोदा पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. तब्बल एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे १० गहाळ मोबाईल शोधून पोलिसांनी ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. या कामगिरीत महिला पोलीस अंमलदार आरती हाफसे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल १० गहाळ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. सुमारे एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले.
जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना ‘सीईआयआर’ पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपास पथकाला विशेष सूचना देत मार्गदर्शन केले.
या संपूर्ण मोहिमेत कासोदा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार आरती हाफसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाचा अचूक वापर करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हरवलेले एकूण १० मोबाईल फोन शोधून हस्तगत करण्यात यश मिळवले.
मोबाईल हरवल्यामुळे अनेक नागरिक त्रस्त आणि चिंतेत होते. मोबाईलमधील वैयक्तिक डेटा तसेच संपर्क क्रमांक गमावल्याने त्यांची चिंता वाढली होती. मात्र, दिवाळीच्या काही दिवस आधीच पोलिसांनी मोबाईल शोधून मूळ मालकांच्या हातात सुपूर्द केले. त्यामुळे नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीबद्दल नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, महिला पोलीस अंमलदार आरती हाफसे यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.
