वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे शेतात काम सुरू असताना एका दुर्मिळ सापाचे दर्शन झाले. सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत या सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे शेतात ओलीत सुरू असताना अत्यंत दुर्मिळ गजरा जातीचा साप आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. शेतकरी लालाजी मोहिजे यांच्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू असताना अचानक हा साप निदर्शनास आला. सापाचा वेगळा आकार आणि रंग पाहून शेतकऱ्यांनी तत्काळ सर्पमित्र रोहित ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच सर्पमित्र भाविक कोपरकर यांच्या नेतृत्वाखाली रोहित ठाकरे, गुड्डू आणि साहिल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत दक्षता आणि कौशल्याने सापाला सुरक्षितरीत्या पकडले. यावेळी सापाला कोणतीही इजा होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली.
गजरा सापाचे शास्त्रीय नाव Coronella brachyura असून, हा महाराष्ट्रात क्वचितच आढळणारा पूर्णतः बिनविषारी साप आहे. हा साप स्वभावाने शांत आणि लाजाळू असतो. मानवी वस्तीत दिसल्यास सहसा माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा सापांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सर्पमित्र भाविक कोपरकर यांनी सांगितले.
सापाला सुरक्षितरीत्या पकडल्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्तता करण्यात आली. दुर्मिळ वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, निसर्गातील प्रत्येक जीवाचे पर्यावरणीय संतुलनात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, साप दिसताच भीतीपोटी त्याला मारण्याच्या घटना घडतात, ही चिंतेची बाब आहे.
दरम्यान, शेतात किंवा घराच्या परिसरात साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्याला हात लावू नये किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. तत्काळ जवळच्या प्रशिक्षित सर्पमित्रांशी किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्रांच्या वतीने करण्यात आले आहे.
