एसटीने प्रवास करणाऱ्या राज्यातील लाखो महिला प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. NCMC कार्ड नसतानाही आता महिलांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ध्या तिकिटाच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने NCMC कार्डाची अनिवार्यता ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी शिथिल केली आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना कार्ड नसतानाही एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळणार आहे.
महामंडळाने १ ऑक्टोबरपासून सवलतीच्या तिकिटांसाठी NCMC कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, अनेक महिलांची नोंदणी आणि कार्ड वितरण प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात १ कोटी १० लाख NCMC कार्डांची नोंदणी किंवा वितरण झाले आहे.
दरम्यान, महिला लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापर्यंत विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के पात्र महिला लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.
ही सवलत तात्पुरती असून महिलांनी या कालावधीत NCMC कार्डाची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
