जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्याला आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मध्य प्रदेशातील खरगोन येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी यावल शहरासह आमोदा, बामनोद, फैजपूर तसेच रावेर, वाघोदा, वडगाव आणि सावदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुखपुरी, तालुका भागलपूर येथे ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. त्याचा प्रभाव जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, सावदा आणि जामनेर परिसरात जाणवला.
सुदैवाने प्राथमिक माहितीनुसार, कुठेही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कोणतेही नुकसान झाले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
