महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृती जपणाऱ्या वाडेगावात व्यसनमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला. श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रभातफेरी आणि जनजागृती सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारताचा संकल्प केला.
महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपत व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव येथे ‘एक कदम गांधी के साथ – नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत प्रभातफेरी व जनजागृती सभा उत्साहात संपन्न झाली.
दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून व्यसनमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक जागृतीचा संदेश दिला. त्यानंतर सकाळी १० वाजता विद्यालयात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या १९३३ मधील वाडेगाव भेटीच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत सत्य, अहिंसा, संयम आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. महादेवराव भुईभार होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश अण्णा दाणे उपस्थित होते. यावेळी विदर्भ भूदान यज्ञ मंडळाचे सचिव श्री. एकनाथ दगवार तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गोपाल मानकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करून व्यसनमुक्त कुटुंब, व्यसनमुक्त गाव आणि व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प करण्यात आला. गांधीजींच्या विचारांचा आदर्श घेऊन युवकांनी समाजपरिवर्तनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जागरूकता आणि व्यसनमुक्त जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाला बबनराव कानकिरड, डॉ. मिलिंद निवाने, डॉ. शिवचरणसिंह ठाकुर, प्रा. डॉ. विवेक हिवरे, प्रल्हादराव नेमाडे, जयकृष्ण वाकोडे, शंकरराव सरप, अनिल मावळे, नितीन भरणे, साहेबराव तायडे, डॉ. अशोकराव मेतकर, गजानन राऊत, महेश आढे, डॉ. जगदीश चिंचोळकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
अमोल जामोदे | एनटीव्ही न्यूज मराठी | बाळापूर
