अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगावच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इयत्ता आठवीतील ओम प्रमोद लोखंडे याची राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली असून, संस्कृती ठाकरे हिनेही विभागीय स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे.

श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगाव येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओम प्रमोद लोखंडे याने आर्चरी अर्थात धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे. विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केवळ चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. त्यामध्ये ओमने स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. लवकरच तो राज्यस्तरावर आपल्या खेळाचे कौशल्य सादर करणार आहे.

याच क्रीडा स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी संस्कृती गोपाल ठाकरे हिनेही विभागीय स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करत आपल्या खेळातील कौशल्याचे दर्शन घडवले. तिचा सहभाग आणि प्रयत्न कौतुकास्पद असून, आगामी वर्षात अधिक जोमाने तयारी करून ती उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास शाळेने व्यक्त केला.

ओमच्या यशाबद्दल तसेच संस्कृतीच्या सहभागाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूनम गावंडे मॅडम, सुपरवायझर भोंडे मॅडम, क्रीडा शिक्षक पाटीलखेडे सर, वर्गशिक्षक गव्हाडे सर, प्रणव मानकर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ओमला या यशापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारे मोहन भाऊ भातरकार यांचेही शाळेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता, जिद्द आणि क्रीडा कौशल्य दडलेले असते, याचे ओम आणि संस्कृती यांनी आपल्या सहभागातून व कामगिरीतून उदाहरण दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी प्रेरणा मिळाली असून, आगामी काळातही असे विद्यार्थी विविध स्तरांवर शाळेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अमोल जामोदे | एनटीव्ही न्यूज मराठी | बाळापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *