पुणे ; इंदापूर तालुक्यातील काटी येथे एकाच चिमुकलीला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी वडील आणि आपल्या लहान भावासोबत शाळेला निघालेल्या एका १२ वर्षीय तृप्तीला खडी वाहून नेत असलेल्या एका हायवा ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडली. काटी वडापुरी रस्त्यावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेत तृप्ती नानासाहेब कदम (रा. काटी, ता. इंदापूर) या ७ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी हा ट्रक पेटवून दिला.
लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ७ वी ब मध्ये शिकणारी तृप्ती वडील नानासाहेब कदम व लहान भाऊ कृष्णा नानासाहेब कदम (वय ११ वर्ष) याच्यासोबत बुलेट या दुचाकी वरून (एमएच ४२ एव्ही ३७६४) शाळेत निघाली होती. यावेळी मागून आलेल्या खडी वाहतूक करत असलेल्या हायवा ट्रकने (एमएच ४२ टी १६५३) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेने रस्त्यावर पडलेल्या तृप्तीच्या अंगावरून ट्रकचे मागचे चाक गेल्याने तृप्ती जागीच ठार झाली.
या घटनेत तृप्तीचे वडील आणि भाऊ हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने हा ट्रक पेटवून दिला. ट्रक ड्रायव्हर विनोद महादेव जवरे (रा. खैरा, ता. यवतमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे