पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचविण्यासाठी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सदैव प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महसूल विभाग राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणारा विभाग आहे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने अहोरात्र काम करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेमडेसिव्हीर औषधाचा पुरवठा, अन्नधान्य वितरण, ऑक्सिजनचा पुरवठा, खाटांची व्यवस्था आदी सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या.
फेरफार अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित नोंदी निर्गमित करण्याच्या कामांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. संगणकीकृत सातबारा करण्याचे काम मोहीम स्वरुपात राबवून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. महसूल वसुलीमध्ये जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यातही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानासोबत अद्ययावत राहून ई-पीक पाहणी, ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आदी विविध प्रकल्पावर काम गतीने काम करायचे आहे.
जिल्ह्यातील विविध पायाभूत प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाहीला गती देऊन नियोजित प्रकल्प वेळेत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांप्रती सकारात्मक वर्तन आणि संवेदनशील राहून काम करावे. कामाशी निगडित कौशल्ये संपादन करावेत, याचा आपल्या कामावर निश्चित सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी श्री. देशमुख म्हणाले, नागरिक महसूल विभागाकडे शासन या भावनेने बघतात. नागरिकांचे वाद, तंटे मिटविण्यसाठी महसूल विभाग काम करीत असतो. त्यामुळे महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे. शासनाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेल्या सेवांमध्ये सातत्य ठेवावे, असेही ते म्हणाले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खराडे म्हणाले, अतिवृष्टी, पूरस्थिती अशा विविध आपत्कालिन परिस्थतीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करतात. सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे कार्य करतात.
यावेळी उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी श्री. देशमुख, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रविण साळुंके, राजेंद्र कचरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, तहसिलदार श्रीकांत पाटील, सचिन पाटील, राधिका हावळ-बारटक्के, नायब तहसिलदार संजय खडतरे, संजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह उत्कृष्ट मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, महसूल सहायक, वाहनचालक, शिपाई, पोलीस पाटील आणि कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. तसेच पुरस्कारार्थ्यांनी प्रतिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे