तु आमच्या मुलीबरोबर लग्न केलेस का ? असे विचारून शिरूर तालुक्यातील एका युवकास मारहाण करण्याची घटना घडली.
राम भाऊसाहेब दळवी वय -२५ वर्षे रा. कान्हूरमेसाई ता.शिरूर जि.पुणे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून दादासाहेब ज्ञानोबा पुंडे, विजय ज्ञानोबा पुंडे, अतुल बाजीराव पुंडे, निरंजन दादा पुंडे सर्वजण रा.कान्हूरमेसाई ता.शिरूर जि.पुणे, अजित टाकळकर रा.टाकळकरवाडी ता.खेड जि.पुणे यांच्याविरूद्ध शिक्रापूर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
तपास अधिकारी , ए एस आय अनिल ढेकणे यांनी दिलेल्या माहितीनूसार , राम भाऊसाहेब दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मी, कान्हूरमेसाई याठिकाणी भाऊसाहेब एकनाथ दळवी आई द्वारका असे एकत्रित राहाणेस असून माझे चाकण येथे जयश्री पॉलिमर्स या कंपनीला फॅब्रिकेशनचे कॉन्ट्रॅक्ट आहे.
मी आमचे गावातील आरती दादाभाऊ पुंडे हिचेबरोबर तिच्या संमतीने आळंदी येथे सदगुरु भुवन मंगल कार्यालय येथे लग्न केले होते. त्यानंतर माझे घराचे बांधकाम चालू असल्याने माझी पत्नी आरती ही तिच्या आई वडीलांकडे राहाण्यास गेली होती.
९/१०/२०२२ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राम दळवी घरी असताना पत्नी आरती हिचा सख्खा चुलता विजय ज्ञानोबा पुंडे यांनी राम दळवी यांना फोन करून सांगितले की, आरती व तुझे लग्नाचे बोलायचे आहे तरी तु लवकर ये ! असे सांगितल्यानंतर फिर्यादी राम दळवी थोड्यावेळाने त्यांची एम एच १४ /इ एफ / ५३४५ या क्रमांकाची स्कूटी घेवून पत्नी आरती हिच्या घरी गेले. तेव्हा घराचे अंगणात दादासाहेब ज्ञानोबा पुंडे, विजय ज्ञानोबा पुंडे, अतुल बाजीराव पुंडे, निरंजन दादा पुंडे, सर्व रा.कान्हूरमेसाई ता.शिरूर जि.पुणे ,अजित टाकळकर रा.टाकळकरवाडी ता.खेड जि.पुणे असे हजर होते. आरतीचे वडील दादासाहेब व चुलते विजय यांनी फिर्यादी राम दळवी याला तु आमच्या मुलीबरोबर लग्न केले का ? असे विचारले असता फिर्यादी राम दळवी यांनी त्यांना सांगितले की, हो ,मी आरतीबरोबर लग्न केले आहे. असे म्हणाल्याच्या कारणावरून अतुल बाजीराव पुंडे ,निरंजन दादा पुंडे ,अजित टाकळकर, यांनी लाकडी दांडक्यांनी राम दळवी यांना दोन्ही पायास,दोन्ही हातास पाठीस,डोक्यास मारहाण करून दुखापत करून दादासाहेब ज्ञानोबा पुंडे ,विजय ज्ञानोबा पुंडे यांनी हाता,लाथा बुक्क्याने मारहाण, शिविगाळ, दमदाटी केली. त्यानंतर राम दळवी यांना त्यांचे घरातील लोकांनी ग्रामीण रूग्णालय शिक्रापूर येथे प्रथमोपचारासाठी नेले. तेथून पुढील उपचारासाठी माऊलीनाथ हॉस्पिटल शिक्रापूर येथे उपचारकामी ऍडमिट केले. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ए एस आय अनिल ढेकणे करत आहेत.
