- नितीन बानगुडे पाटील यांचा ‘गुंडगिरी विरुद्ध विकास’चा मुद्दा..!

जामखेड प्रतिनिधी (दि. २ डिसेंबर)
अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या उमेदवार संध्या शहाजी राळेभात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार रोहित पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी भाजप आणि राम शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
‘गुंडांच्या वाटेवर चालणारे की विकासाकडे नेणारे?’
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली:
- विकासाची खिचडी: “भाजपने जामखेडच्या विकासाची खिचडी केली आहे.”
- गुंडगिरीचा आरोप: “गुंडांच्या वाटेवर चालणारे हवेत की, जामखेडला विकासाच्या वाटेवर नेणारे नगरसेवक हवे आहेत? एमआयडीसी उभारले तर जामखेड सुजलाम सुफलाम होईल.”
- पवारांचे कौतुक: “सर्व जातींच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा नेता आमदार रोहित पवार आहेत. संध्याताई शहाजी राळेभात व उमेदवारांना निवडून दिल्यास शहराला स्वच्छ पाणी, चांगले रस्ते आणि मुलांसाठी दर्जेदार शिक्षण मिळेल.”
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर पवारांचा खोचक सवाल
आमदार रोहित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत केलेल्या विकास आश्वासनांवर थेट आक्षेप घेतला.
- खोटारडेपणाचा आरोप: “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवेतले शब्द सोडून जामखेड येथील जाहीर सभेत खोटी विकास आश्वासने दिली आहेत. शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स, पिण्याच्या पाण्याची योजनेची मंजुरी दिली—अहो राम शिंदे सर, किती खोटं बोलणार?” असा खोचक सवाल करत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामे झाल्याचा ठसका दिला.
- गुंडगिरी विरुद्ध सलोखा: “सामन्य परिवारातील उमेदवारांना संधी दिली असून ‘रामकृष्ण हरी’ व बसवा गुंडांना घरी. भाजप उमेदवार निवडून आले तर शहरात गुंडगिरी व जुगाड वाढेल,” असा इशारा त्यांनी दिला.
- मतदान दिवशी इशारा: “मतदान दिवशी पूर्ण दिवसभर शहरात असेन. आमच्या उमेदवाराला धमकावले तर गाठ माझ्याशी आहे,” असा सक्त इशारा त्यांनी दिला.
‘दोन नंबर’ आणि ‘सात क्रमांक’
युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर अंकगणिताच्या माध्यमातून टीका केली:
- “विरोधकांना मिळालेला दोन क्रमांक आणि त्यांचा दोन नंबरचा माल, दोन्हींचा मेळ अगदीच जुळतो.”
- “सत्ता येणार म्हणून आमच्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने सात क्रमांक दिला. देशाचं वाटोळं करून धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन करू नका. आमची खरी लढत भाजपाशी आहे.”
- “महिला आरक्षणासाठी कायदा करणारे शरद पवार साहेब असल्याने संध्याताई भाग्यवान आहेत.”
- “३ तारखेला नगराध्यक्ष ठरणार, ज्योतिषाची गरजच नाही! चिंतामणींनी जो मणी देऊन पंजा उभा केला, त्याला आता चिखलातील कमळाची साथ आहे. त्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. शेवटी गंगाधरही शक्तिमान आहे!”
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख, किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी, गोविंद पोलाड, आरपीआयचे सचिन खरात, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. मयुर डोके यांच्यासह महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी नंदु परदेशी,
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.
