अहमदनगर : पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.
आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला घेऊन जात असताना भिंगार नाला परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने पोलीस स्टेशनला दिलेली आहे. रूक्सार बिराजदारच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मात्र, आरोपी सादिकला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस कर्मचारी शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी सादिकविरोधात 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सादिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सादिकचा मृत्यू झाला आहे.
सादिकचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच अपर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, श्रीरामपूरचे उपाधीक्षक संदीप मिटके, नगर शहर विभागाचे उपाधिक्षक विशाल ढुमे, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आदी सादिकवर उपचार चालू असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.