कर्जत प्रतिनिधी-सुनील मोरे
अहमदनगर : अष्टविनायक गणपतीं पैकी अहमदनगर जिल्ह्यातील एक गणपती असलेल्या सिद्धटेकच्या विकासासाठी भरीव निधीसाठी कर्जतचे आ.रोहित पवार हे प्रयत्नशील आहेत. राज्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अशोक बापू पवार, आमदार अतुल बेनके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ.रोहित पवार यांनी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या आपल्या मतदारसंघातील सिद्धटेक, सद्गुरू संत गोदड महाराज, संत सितारामबाबा, संत गीतेबाबा, खर्ड्याचा किल्ला तसंच राशीनची जगदंबा देवी मंदिर परिसरातील विकास कामांसंदर्भातही चर्चा करून वाढीव विकासनिधी बाबत प्रस्ताव दिले. कर्जत-जामखेड तालुक्यात अनेक प्रसिद्ध देवस्थाने असली तरी भाविकांना या ठिकाणी अनेक सोयीसुविधा मिळत नाहीत. रस्त्यांचा प्रश्न आहे. यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असली तरी भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटन हब निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी भरीव निधीची गरज आहे, त्याअनुषंगाने आ.पवार हे प्रयत्नशील आहेत.
सिद्धटेक पर्यटन हब व्हावे -सरपंच पल्लवी गायकवाड
अष्टविनायक दर्शनासाठी हजारो भाविक सहकुटुंब इच्छुक असतात. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकातील असलेल्या गणपती तिर्थक्षेत्रांचा चांगला विकास झालेला आहे. त्यात महामार्गावरील रांजणगाव आदी ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते, मात्र नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक तीर्थक्षेत्र हे काहीसे दुर्लक्षित राहिल्याची खंत सिद्धटेकच्या सरपंच पल्लवी सुजित गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, सध्या शासनाने चाळीस कोटींचा सिद्धटेक तीर्थक्षेत्र विकासा साठी निधी तांत्रिक मंजुर केला असून कामे सुरू आहेत. मात्र सिद्धटेक हे पर्यटन हब व्हावे यासाठी या ठिकाणी बोटिंग, वाटरपार्क आदी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या योजना होणे गरजेचे आहे. त्या साठी तीनशे कोटींचा नियोजित विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या कामासाठी सिद्धटेक ग्रामपंचायतीने ८० एकर जागा मंजूर केलेली आहे. सिद्धटेक हे पुणे-लातूर महामार्गाला जोडले जाणार आहे, त्यामुळे भक्तांचा ओढा भविष्यात वाढून पर्यटकांना आकर्षित करता येतील अशा सुविधा दिल्या गेल्यास या परिसरात रोजगार, उद्योग या माध्यमातून विकास शक्य आहे, त्यासाठी शासनाने पर्यटन हबच्या दृष्टीने नियोजित विकास आराखड्यास निधी मंजूर करावा अशी मागणी सरपंच गायकवाड यांनी केली आहे. सिद्धटेक गणपती न्यासची खाजगी मालकी आहे. न्यासकडून गावासाठी कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.