भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांची मागणी
पुणे : शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचे, डी पी कनेक्शन महावितरणने कट करू नये , तसेच १३/१०/२०२१ च्या पत्राच्या माहितीची पुर्तता करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पाचंगे यांनी म्हटले आहे की, शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचे वीजकनेक्शन व डी पी चे कनेक्शन महावितरणकडून बंद केले जात असल्याबाबत शेतकरी बांधवांच्या तक्रारी येत आहेत ही संतापाची बाब आहे.
राज्य सरकारने एक चालू वीजबील भरण्याचा निर्णय घेतला आहे पण ते भरले नाही.वीजकनेक्शन तोडा असे कुठेही सांगितले नाही. पावसाळ्यात जवळपास ९० टक्के शेतीपंप बंदच होते.दि. १३/१०/२०२१ रोजी केडगाव विभागाची १ ते २४ मुद्द्यांची माहिती मागितली आहे पण कार्यालयाकडून त्याची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही असे निवेदनात म्हटले आहे. महावितरण कर्मचा-यांनी आततायीपणा करून शेतक-यांना वेठीस धरण्याचा किंवा छळण्याचा प्रयत्न केला तर होणा-या परिणामांना कार्यकारी अभियंता जबाबदार असतील कारण कनेक्शन बंद करताना संबंधित कर्मचारी,अधिकारी कार्यकारी अभियंत्यांचे आदेश असल्याचे सांगतात. यासंदर्भात तातडीने खुलासा करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
