लेझीम, झांज पथकाचे डाव, विविध कवायती आणि लाठी-काठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके
पारंपारिक क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज -राहुल दामले

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध मैदानी स्पर्धांच्या थराराने उत्साहात पार पडला. बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द संचलन, लेझीम, झांज पथकाचे डाव व विविध कवायती आणि लाठी-काठीच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय जलतरणपटू राहुल दामले व छत्रपती पुरस्कार विजेती मंजिरी दामले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य श्री. आनंद कटारिया, सौ. निकिता कटारिया, श्रीम्. गुलाब कटारिया, सौ.माधवी जक्कल, श्री. अक्षय नायडू आदींसह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य श्री. आनंद कटारिया म्हणाले की, कोरोना काळात शाळा बंद व ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी मोबाईलकडे वळाले. त्यांना मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी मैदानी खेळाकडे वळवण्याची गरज आहे. शिक्षणाला कला, क्रीडांची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल दामले म्हणाले की, लुप्त होणाऱ्या पारंपारिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. खेळाला प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना मैदानी खेळाकडे वळवले पाहिजे. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य मैदानी खेळातून चांगले राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
वार्षिक क्रीडा महोत्सवात रनिंग, फुटबॉल, कबड्डी, गोळा फेक, डॉज बॉल, लंगडी आदी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह, पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.