लाडकी बहीण योजना : रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणा लाडकी बहीण योजनेचा हप्ता..
लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसंदर्भात आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा पहिला हफता१७ ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधन पूर्वीच ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
लाडक्या बहीण योजनेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अजूनही वाढताना दिसत आहे. कारण, राज्य सरकारने १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्ट केल्याने लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा मिळाली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत.तब्बल तीन हजार रुपयांचा हा पहिला हफ्ता असणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. १७ ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ४० लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छानणी ही पूर्ण झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे.