महंत रामगिरी महाराजांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने मुस्लिम समाजाची बदनामी झाली. त्यामुळे सोशल मीडियावरून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करत अमिन इद्रीसी यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पाेलिसांना दिले आहे.


या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. रामगिरी महाराजांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होत आहे. त्याने सामाजिक सलोखा बिघडून गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील एजाज नख्वी यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने हे व्हिडिओ तातडीने हटवण्याचे आदेश देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.