केंद्र सरकारने बनविलेल्या वक्फ सुधारणा विधेयक २०२५ च्या विरोधात आता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली देशभरात या कायद्याविरोधात जनजागरण मोहीम सुरू आहे आणि याच अंतर्गत भोकरदन तालुक्यातील धावडा गाव मध्ये बुधवारी रात्री ‘बत्ती गुल’ आंदोलन करण्यात आले.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ३० एप्रिल रोजी रात्री ९ ते ९:१५ या वेळेत ‘वक्फसाठी १५ मिनिटे बत्ती गुल करून – एक मूक भूमिका’ आणि ‘एक आवाज, एक चळवळ – बत्ती गुल’ असे आवाहन केले होते. या आवाहनाला धावडामधील मुस्लिम बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या घरातील, दुकानांमधील, व्यावसायिक ठिकाणांमधील आणि मशिदींमधील दिवे बंद करून शांतपणे या कायद्याचा निषेध नोंदवला.

या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्याला ‘काळा कायदा’ म्हटले आणि तो त्वरित रद्द करण्याची मागणी केली. जोपर्यंत सरकार हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत आपला विरोध कायम राहील, असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे धावडा आणि
समता नगर आसपासच्या परिसरात १५ मिनिटांसाठी अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *