भूम:
भूम शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तात्कालीन पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या बदलीपासून शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे. आठवडे बाजारातून मोटरसायकली चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असतानाच, आज पहाटे बॅटरीच्या दुकानात झालेल्या चोरीमुळे भूम पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूम आगाराजवळील इंडिया बॅटरी ॲन्ड ऑटो इलेक्ट्रिशियन या दुकानात (दि. २१) रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी शटर कटावणीने तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या बल्बच्या दोन्ही तारा एकत्र जोडून शॉर्टसर्किट केले आणि मेन पॉवर सप्लाय बंद केला, ज्यामुळे संपूर्ण लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. यानंतर चोरट्यांनी नवीन चारचाकी, दुचाकी आणि मोठ्या गाड्यांच्या बॅटऱ्या तसेच बॅटरीच्या स्क्रॅपसह अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे साहित्य लंपास केले. यामुळे व्यापारी मुबारक शेख यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर भूम शहरात पोलीस प्रशासनाविरोधात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बीट अंमलदार आपली भूमिका योग्यप्रकारे बजावत आहेत का, याबाबतही लोकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे.
मागील महिन्यात, जूनमध्ये, भूम येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी दरोडा टाकून मोठी रक्कम चोरून नेली होती. त्यानंतर भूम आठवडे बाजारामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्य दिसून आले आहे. आता बॅटरीच्या दुकानात झालेल्या चोरीने चोरट्यांनी भूम येथील पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
व्यापारी वर्ग बँकेचे कर्ज काढून किंवा मिळेल तिथून रक्कम जमा करून छोटे व्यवसाय सुरू करत आहेत, मात्र अशाप्रकारे होणाऱ्या चोऱ्यांमुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात सतत होणाऱ्या या चोऱ्या थांबवून, चोरलेले साहित्य परत मिळवून द्यावे आणि चोरट्यांना तात्काळ पकडावे, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
प्रतिनिधी गौस शेख
एनटीव्ही न्यूज मराठी – धाराशीव