वाशिम:
वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यासाठी विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून, गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून ९० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही व्यक्ती वाशिम जिल्ह्यात गांजा विक्रीसाठी आणत असल्याची खात्री झाली होती. या माहितीच्या आधारे तात्काळ पथक रवाना करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
दिनांक २१ जुलै २०२५ रोजी वाशिम येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला होता. दरम्यान, दोन संशयित व्यक्ती दिसल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील बॅगांची झडती घेतली असता, शेख शहेजाद शेख मुख्तार (वय २५, रा. सिव्हील लाईन, वॉर्ड क्र. ०६, मालेगाव, ता. मालेगाव, जि. वाशिम) याच्या बॅगमध्ये ३.०२३ किलोग्रॅम आणि मुश्ताक मोहम्मद रफिक (वय ३३, रा. गांधी नगर, मालेगाव, ता. मालेगाव, जि. वाशिम) याच्या बॅगेत २.९९५ किलोग्रॅम असा एकूण ६.०१८ किलोग्रॅम गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या गांजाची अंदाजे किंमत ९०,०००/- रुपये असून, पंचासमक्ष त्याचे वजन करून ताब्यात घेण्यात आले.
सदर इसमांनी गांजा सदृश्य अमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करून त्यांना वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, अंमलदार विनोद सुर्वे, गजानन झगरे, सुरज खडके, आशिष बिडवे, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, संतोष वाघ, संदीप दुतोंडे, शुभम चौधरी आणि वैभव गाडवे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. या कारवाईची वरिष्ठ पातळीवरही दखल घेण्यात आली आहे.
प्रतिनिधी फुलचंद भगत,
एनटीव्ही न्यूज मराठी; मंगरूळपीर (वाशिम).