सुषमादेवी यांच्या मधुर मंजुळ आवाजातील एका पेक्षा एक सरस गीताने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध..

छत्रपती संभाजीनगर :
महाकवी वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराव बोरडे यांची जयंती निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बारा गुणी व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद इंगळे, उपायुक्त नंदकुमार भोंबे, भदंत संघपाल थेरो, डॉ. ऋषीकेश कांबळे आणि ॲड .रविकुमार तायडे, रतनकुमार साळवे उपस्थित होते.
या प्रसंगी गायिका सुषमा देवी यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच एकूण बारा मान्यवरांना शिक्षण महर्षी माधवराव बोरडे व महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमात भीमशाहिरा सुषमादेवी, मेघानंद जाधव, अजय देहाडे, राहुल जेठे आणि स्नेहल कीर्तने यांनी एकापेक्षा एक सरस बुद्ध-भीम गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी बालाजी सोनटक्के, डॉ. आनंद इंगळे, नंदकुमार भोंबे आणि ॲड. रविकुमार तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निळे प्रतीक संस्थेचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी करून या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. संस्थेच्या सचिव विद्या सुरडकर, सुनीता साळवे, गीतांजली पवार, कांचन आराक यांनी भिमशाहिरा सुषमा देवी यांना साडी-चोळी व रोख सहकार्य देऊन गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाताई सुरडकर यांनी मानले. स्वातंत्र्यदिनी शुक्रवारी झालेल्या या भव्य कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
प्रतिनिधी जब्बार तडवी
एन.टीव्ही न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.