आमदार शाम खोडे यांचा शेतकऱ्यांना धीर; तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश.


वाशिम:

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यासह मंगरूळपीर तालुक्यात मोठी हानी झाली आहे. शेतातील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आणि हळद यांसारखी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. याशिवाय, अनेक ठिकाणी गुरेढोरे वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोरगरीब शेतमजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरून त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शाम खोडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, ‘या संकटाच्या काळात मी स्वतः आणि शासन खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत. पंचनामे करून मिळणाऱ्या मदतीत कोणताही विलंब होणार नाही. शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे.’

शेतकऱ्यांनी हताश न होता संयम बाळगावा, असे आवाहन करताना आमदार खोडे म्हणाले की, ‘ही नैसर्गिक आपत्ती आहे, पण धैर्य आणि आत्मविश्वासाने आपण यावर मात करू शकतो. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल.’


एनटीव्ही न्यूज मराठी, मंगरूळपीर, वाशिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *