
वाशिम:
बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेला तिज उत्सव मंगरुळपीर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात महिलांनी पारंपरिक नृत्ये सादर करत आपला आनंद व्यक्त केला.

बंजारा परंपरेतील सर्वात महत्त्वाचा असलेला तिज उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. इसवी सन पूर्व काळापासून ही परंपरा चालत आली आहे. या उत्सवामध्ये अविवाहित मुली दहा दिवस आधी एका टोपलीत ‘गौरी स्वरूप’ गहू पेरतात आणि रोज त्याला पाणी घालून आपल्या बोलीभाषेत आराध्य देवतांची गीते म्हणतात.
विसर्जनाच्या दिवशी, डोक्यावर ‘गौरी’ स्वरूप धान घेऊन वाजतगाजत तांड्याला प्रदक्षिणा केली जाते. या उत्सवासाठी लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली विशेषतः माहेरी येतात, ज्यामुळे या सोहळ्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते.

या उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक वेशभूषेत महिला आणि मुलींनी फेर धरून नृत्य केले. हा उत्सव मातृशक्तीला वंदन करणारा असून, ‘गण गौर’ या आद्य देवतेचे महत्त्व दर्शवणारा आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली खास परंपरा आणि लोकसंस्कृती जपल्याचे या उत्सवाद्वारे दिसून येते.
एनटीव्ही न्यूज मराठी, मंगरूळपीर, वाशिम