गंगापूर (प्रतिनिधी) : अमोल पारखे
गंगापूर तालुक्यातील मुददेशवाडगाव परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. एकापाठोपाठ दोन चुलत भावांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने संपूर्ण गाव हादरले आहे. १२ वर्षीय सिद्धार्थ विजय चव्हाण याच्या खुनानंतर, अवघ्या दोन दिवसांनी त्याचाच चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण (वय २३) याचाही मृतदेह विहिरीत आढळल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
१२ वर्षाच्या सिद्धार्थच्या खुनाचे गूढ
१४ ऑगस्ट रोजी दुपारी हकीकतपूर शिवारात राहणारा सिद्धार्थ किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडला. बराच वेळ झाला तरी तो परतला नाही, म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. त्यांना भारत दारुंटे यांच्या मक्याच्या शेताजवळ सिद्धार्थची सायकल, रिकामी पिशवी आणि शंभर रुपयांची नोट पडलेली आढळली. त्याच ठिकाणी रक्ताचे डागही दिसले, जे थेट जवळच्या विहिरीकडे जात होते. गंगापूर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून रात्री आठच्या सुमारास सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. हा घातपात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्याची आई सुरेखा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या मृतदेहाने वाढले रहस्य
सिद्धार्थच्या या धक्कादायक घटनेनंतर अवघ्या दोनच दिवसांनी त्याचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण जनावरांसाठी गवत आणायला गेला, पण तोही घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता, हकीकतपूर शिवारातील संतोष गंगाधर चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीस पाटील राऊत आणि सरपंच योगेश तारू यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
सलग दोन चुलत भावांचे मृतदेह अशा प्रकारे विहिरीत सापडल्याने गावात भीती आणि शोककळा पसरली आहे. या दुहेरी घटनेने पोलीसही चक्रावले आहेत. हे दोन्ही खून एकाच व्यक्तीने केले आहेत का? त्यांच्या मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणाचे गूढ लवकरच उकलले जाईल अशी अपेक्षा आहे.
(प्रतिनिधी : अमोल पारखे, गंगापूर)