गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे
गंगापूर तहसिल कार्यालयात गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ या पारंपरिक सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. दोन्ही सण शांततेत, उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
बैठकीस तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रभारी तहसीलदार सागर वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, उपनिरीक्षक अनिल झोरे, डॉ. स्वप्नील लगाने, मनोज नवले, नगरपरिषद अधिकारी, विविध धार्मिक संस्था तसेच मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत मिरवणुकीचे मार्ग, ध्वनीक्षेपकांचा योग्य वापर, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, वीजपुरवठा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी डिजे वापरास संपूर्ण बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानेच मिरवणुका काढाव्यात, असे प्रशासनाने आवाहन केले.
📌 प्रतिक्रिया
धार्मिक संस्था, मंडळ पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. “सण हा एकतेचा, बंधुत्वाचा आणि आनंदाचा असतो; त्याला गोंधळाचे स्वरूप येऊ नये यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे,” असे मत बहुतेक उपस्थितांनी व्यक्त केले.
👉 उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी सांगितले की, “गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नये; नियमांचे पालन करून सण साजरे करावेत. प्रशासनाशी सहकार्य केल्यास सण अधिक आनंदी आणि सुरक्षित होतील.”
तहसीलदार वगवाड यांनीही सांगितले की, “गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून सौहार्द जपावे, हीच सर्वांची जबाबदारी आहे.”