- ‘श्रीयश एज्युकेशन फाउंडेशन’ पुणेतर्फे देण्यात येणार हा सन्मान.
बारामती, पुणे : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील दोन व्यक्तींची कला आणि पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामध्ये NTV न्यूज मराठीचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांचाही समावेश आहे. पुणे येथील एका सामाजिक संस्थेतर्फे ही माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर राऊत आणि ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले मनोहर तावरे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘श्रीयश एज्युकेशन फाउंडेशन पुणे’ या संस्थेतर्फे मुख्य आयोजक श्रीराम सावंत यांनी ही माहिती दिली. राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ही संस्था दरवर्षी गौरवते.

गेली दहा वर्षांपासून ही संस्था सामाजिक स्तरावर हा उपक्रम राबवत आहे. सांप्रदायिक क्षेत्रात तसेच अन्य समाजोपयोगी उपक्रमांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची या माध्यमातून दखल घेतली जाते. या पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनाचे औचित्य साधून रविवार, ७ सप्टेंबर रोजी बारामती येथे एका विशेष कार्यक्रमात होणार आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी, बारामती.