मोरगाव (बारामती): बारामती तालुक्यातील सुपा येथील एका व्यापाऱ्याची मका खरेदीच्या नावाखाली तब्बल 23 लाख 28 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सुपे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि चातुर्यामुळे आरोपीने अटक होण्यापूर्वीच फसवणुकीची सर्व रक्कम परत केली. या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारामती कृषी बाजार समिती अंतर्गत असलेल्या उपबाजार समितीमध्ये स्थानिक व्यापारी गौरव चांदगुडे यांनी 16 जुलै 2025 रोजी सुपे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागपूर येथील एका व्यक्तीने इंडिया मार्ट या वेबसाईटद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता. सुरुवातीला 25 टन मक्याचा व्यवहार यशस्वीपणे पार पाडल्यामुळे व्यापाऱ्याचा विश्वास बसला. यानंतर, ‘अमोल ट्रेडर्स’ने 103 टन मका खरेदीची नोंद केली.
आरोपीने मका भरलेल्या ट्रकांचे वजन आणि बिल पेमेंट्सच्या पावत्या पाठवल्या. मात्र, दोन दिवसात येणारे ट्रक आलेच नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सुपे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांना माहिती दिली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिसांनी तपास सुरू केला.
या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिग्नेश कोळी, रवींद्र मोहरकर, आणि पोलीस हवालदार संदीप लोंढे, विशाल गजरे, महिला पोलीस हवालदार मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, संशयित आरोपीने प्रथम जिल्हा न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, पोलिसांनी आरोपीने राज्यात आणि राज्याबाहेर केलेल्या मोठ्या गुन्ह्यांची माहिती मिळवली. ही माहिती न्यायालयासमोर योग्य प्रकारे मांडून त्यांनी आरोपीला अटकपूर्व जामीन का देऊ नये, हे पटवून दिले.
पोलिसांच्या या चातुर्यामुळे आणि सतर्कतेमुळे अटक होण्यापूर्वीच आरोपीने व्यापाऱ्याला फसवणुकीची संपूर्ण रक्कम परत केली. यामुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्याला मोठा दिलासा मिळाला असून, सुपे पोलिसांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ठरले आहे.
प्रतिनिधी मनोहर तावरे,
एन टीव्ही न्यूज, बारामती, पुणे