• पुरस्कारामुळे आदर्श गाव हिवरे बाजारच्या यशात आणखी एक मानाचा तुरा.


अहिल्यानगर:

आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या हिवरे बाजार गावाला नुकताच पंचायतराज मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ‘जलसमृद्ध गाव’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरण कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. गावातील जलसंधारण आणि पाण्याचा योग्य वापर या कामामुळे हे यश मिळालं आहे.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात विधान परिषदेचे अध्यक्ष रामजी शिंदे, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रम पाचपुते, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते. हिवरे बाजार गावाने पाण्याच्या ताळेबंदावर आधारित पीक पद्धती आणि दर्जेदार जलसंधारण कामे केल्यामुळे हे यश मिळाले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देऊन कार्यक्षम बनवणे हा आहे. यामुळे शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या निमित्ताने ‘गावाचा विकास म्हणजेच जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास म्हणजेच राज्याचा विकास’ ही संकल्पना अधिक बळकट होईल. हिवरे बाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *