अहिल्यानगर: आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. भारत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. भारत पाटील म्हणाले, “हिवरे बाजार सहकारी संस्थेची सभासद पातळीवर दरवर्षी ३१ मार्च रोजी होणारी १०० टक्के वसुली ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. नागरिकांना सावकारीतून मुक्तता मिळावी म्हणून सुरू झालेली ही सहकार चळवळ यशस्वी करण्यासाठी सभासदांनी वेळेवर पीककर्ज भरणा करून शासनाच्या सहकार चळवळीला प्रतिसाद द्यावा, कारण यातच सभासदांचे हित जोपासले जाते.” यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम असून सभासदांनी आपल्या कष्टाचा पैसा जिल्हा बँकेतच गुंतवावा, असे आवाहनही केले.

सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले. तसेच सन २०२४-२५ चा वार्षिक जमा खर्च आणि ताळेबंद मंजुरीसाठी ठेवण्यात आला, ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. याशिवाय, सन २०२५-२६ साठी कर्ज मंजुरी पत्रके तयार करण्याचा अधिकार पंच कमिटीला देण्यात आला. सन २०२४-२५ चा ऑडीट मेमो वाचून त्याची नोंद घेण्यात आली. तसेच सन २०२५-२६ सालाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आणि या कालावधीसाठी वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करण्यासही मंजुरी देण्यात आली.

या सभेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे संचालक मंडळाच्या शिफारशीप्रमाणे नफ्यातून सभासदांना १४ टक्के लाभांश वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, सदरची लाभांश रक्कम सभासदांनी सोसायटीच्या नवीन इमारत बांधकामासाठी ‘लोकवर्गणी’ म्हणून जमा करण्याचे ठरले. सोसायटी कार्यालयासाठी नवीन सुसज्ज इमारत लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही सर्वानुमते ठरले.

यावेळी विमलताई ठाणगे सरपंच, छबूराव ठाणगे चेअरमन, रामभाऊ चत्तर व्हा चेअरमन, बाबासाहेब गुंजाळ तसेच सर्व संचालक मंडळ, सचिव कुशाभाऊ ठाणगे यांच्यासह दामोधर ठाणगे, अर्जुन पवार, पादीर सर, रोहिदास पादीर, बबन पाटील, अशोक गोह्ड, संजय ठाणगे, विठोबा चव्हाण, गोपीनाथ ठाणगे, अमृता पवार, संजना पादीर, अरुणा बांगर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *