- विठ्ठल काळे यांची ‘बापल्योक’ आणि ‘काजरो’ या चित्रपटांसाठी गौरवपूर्ण कामगिरी.

अहिल्यानगर:
मराठी चित्रपटसृष्टीतील उगवता तारा विठ्ठल नागनाथ काळे याने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच अभिनेता ठरला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाने मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावली आहे.
विठ्ठल काळेला नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारच्या ५८ व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बापल्योक’ या चित्रपटातील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट कथा’ आणि ‘सर्वोत्कृष्ट संवाद’ असे एकूण तीन पुरस्कार मिळाले होते.
त्याचप्रमाणे, गोवा राज्य सरकारतर्फे पणजी येथे झालेल्या १० व्या गोवा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्याला ‘काजरो’ (The Bitter Tree) या कोकणी चित्रपटातील भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, विठ्ठलला कोकणी भाषा येत नसतानाही, त्याने ती भाषा शिकून ही भूमिका यशस्वीपणे साकारली आहे. या ‘काजरो’ चित्रपटाने यापूर्वीच ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे.
विठ्ठलने ‘बापल्योक’, ‘पुनःश्च हरिओम’, ‘लाईक आणि सब्स्क्राईब’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘राक्षस’, ‘Hotel Mumbai’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि ‘मानवत मर्डर्स’ या वेब सिरीजमध्येही प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
आपल्या यशाबद्दल बोलताना विठ्ठलने दोन्ही राज्यांचे, तसेच निवड समिती, परीक्षक, दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्माते यांचे आभार मानले. “या पुरस्कारांमुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे सांगत, भविष्यात अशाच चांगल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छाही त्याने व्यक्त केली.
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.