- न्यूज १८ लोकमत आणि साम टीव्हीच्या संपादकांच्या हस्ते झाला गौरव.
- पुरस्कारामुळे सामाजिक कामासाठी आणखी ऊर्जा मिळेल, गिरमाजी सुर्यकार यांची भावना.

नांदेड: पनवेल आणि महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘दैनिक युवक आधार’ वृत्तपत्राचा दुसरा वर्धापनदिन सोहळा रविवारी, ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ‘दैनिक युवक आधार’चे तालुका प्रतिनिधी गिरमाजी सुर्यकार यांना ‘महाराष्ट्र राज्य युवक आधार रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याचे उद्घाटन उद्योगपती सुधीर कटेकर, न्यूज १८ लोकमतचे सहसंपादक विलास बडे, साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे आणि अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विलास बडे यांनी प्रत्येक व्यक्तीने संधी मिळाल्यावर आपला ‘कणा’ दाखवला पाहिजे असे सांगितले. अन्याय होत असेल तिथे पत्रकार आणि जनतेने आपली भूमिका स्पष्ट करून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. “पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे काम नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे,” असे सांगत समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘दैनिक युवक आधार’ने अल्पावधीत केलेल्या समाजहिताच्या कामाचा उल्लेखही त्यांनी केला.
समाजातील युवकांना प्रेरणा देणाऱ्या आणि पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गिरमाजी सुर्यकार यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने जिल्ह्यांमधील विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गिरमाजी सुर्यकार यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या असलेल्या मार्गदर्शक आणि कार्यकर्त्यांचा आहे. हा सन्मान मला पत्रकारिता आणि समाजकार्यासाठी आणखी ऊर्जा देणारा आहे.”
माधव हानमंते, एनटीव्ही न्यूज मराठी, नांदेड.