- आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली.

नांदेड:
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ ऑगस्ट रोजी करकाळा शिवारात एका अविवाहित तरुणाला आणि विवाहित तरुणीला हातपाय बांधून विहिरीत फेकून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये १७ वर्षीय लखन बालाजी भंडारे (रा. बोरजुन्नी) आणि १७ वर्षीय संजीवनी सुधाकर कमळे (रा. गोळेगाव) यांचा समावेश आहे. संजीवनी विवाहित असूनही लखनसोबत तिचे प्रेमसंबंध होते. २५ ऑगस्टच्या दुपारी दोघेही गोळेगाव येथे एकत्र असताना मुलीच्या नातेवाईकांनी त्यांना पाहिले. त्यानंतर त्यांनी लखनला पकडून ठेवले आणि मुलीच्या वडिलांना बोलावले.

संतापाच्या भरात आरोपी मारोती लक्ष्मण सुरणे (रा. गोळेगाव) यांनी दोघांनाही हातपाय बांधून करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिले. या क्रूर कृत्यानंतर आरोपीने स्वतः उमरी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी सातच्या सुमारास तरुणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला, तर तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. उमरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अंकुश माने यांनी पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह तिघांना अटक केली असल्याचे समजते. या दुहेरी हत्याकांडामुळे गोळेगाव, करकाळा आणि बोरजुन्नी परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.
प्रतिनिधी माधव हानमंते
एनटीव्ही न्यूज मराठी, नांदेड.