नांदेड: राज्यात गुटखा विक्री, उत्पादन आणि साठवणुकीवर कडक बंदी असतानाही अनेक ठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, धर्माबाद तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना जेरबंद केले आहे.

२८ जुलै रोजी, धर्माबाद तालुक्यातील येताळा ते करखेलीकडे जाणाऱ्या रोडवरील हसनाळी गावाच्या फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी शेख निजामोद्दीन शेख अहमद (वय ४०, व्यवसाय किराणा दुकान, रा. बंगला गल्ली भैसा, मंडल भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) आणि मसीयोदिन बहीदोद्दीन (वय २५, व्यवसाय ऑटो चालक, रा. बंगला गल्ली भैसा, मंडल भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) हे दोघे त्यांच्या ताब्यातील ऑटो क्रमांक १८/५४९३ (किंमत ७०,०००/- रु.) मध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा घेऊन जाताना आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत, या गुटख्याची किंमत ४५,१००/- रु. असल्याचे निष्पन्न झाले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने हा गुटखा बाळगल्याचे पोलिसांना आढळले.

पोलीस अधिकारी उद्धव माधवराव मुंढे यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. २३६/२०२५ कलम १२३, २७४, २७५, बीएनएस-२०२३ सह कलम ५९ अन्न सुरक्षा २००६ कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले असून, पुढील तपास ए.पी.आय. लोणेकर करत आहेत.

प्रतिनिधी माधव हानमंते

एनटीव्ही न्यूज मराठी, नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *