नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात असलेल्या सर्वधर्मीय श्रद्धास्थान बाबा सोनापीर दर्गाह या पौराणिक वास्तूच्या दुरुस्तीची मागणी दर्गाहचे मुतवल्ली शेख बाबर फकीर मोहम्मद यांनी पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस म. गर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेत, संचालकांनी सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्यासह ‘कलेक्टिव्ह प्रॅक्टिस’ कंपनीच्या नागपूर येथील आर्किटेक्ट आणि पुरातत्व विभागाचे कंत्राटदार वैजनाथ फड मामा यांच्या समवेत आज (दि. २२) सोनापीर बाबा दर्गाहच्या दुरुस्तीसाठी पाहणी केली.
माहूर शहरात असलेल्या बाबा सोनापीर दर्गाहची ख्याती दूरवर पसरलेली असल्याने, येथे वर्षभरात लाखोच्या संख्येने सर्वधर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी येतात. विशेषतः, मार्च महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सलाना उर्समध्ये कवाली, सर्वधर्मीय कार्यक्रम, कुस्त्यांच्या दंगली, मनोरंजनाची साधने आणि विविध वस्तूंची दुकाने लागत असल्याने उर्सच्या पाच दिवसांत पाच लाखांहून अधिक भाविक येथे येतात. तसेच, दर महिन्याच्या पाच तारखेला छोटा उर्स भरत असल्याने यावेळीही हजारो भाविक गर्दी करतात. मात्र, सोनापीर बाबा दर्गाहचा १९ एकरचा परिसर अद्यापही विकासापासून वंचित आणि काही प्रमाणात भकास दिसत आहे.

दर्गाहची मुख्य इमारत पावसाळ्यात गळत असल्याने, तिच्या दुरुस्तीची तातडीने गरज आहे, अशी मागणी मुतवल्ली बाबर भाई यांनी सर्व संबंधितांकडे केली होती. त्यांनी परिसरातील विकासकामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीचीही मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी नांदेडचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांना पत्र पाठवून तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने, त्यांनी आज माहूर येथे भेट देऊन पाहणी केली. दर्गाहासोबतच शहरातील पुरातत्व विभागाकडे असलेल्या सर्व वास्तूंचीही पाहणी केल्याने भाविकांसह नागरिक आणि दर्गाह कमिटीकडून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक नांदेड अमोल गोटे, कंत्राटदार वैजनाथ फड मामा, ‘कलेक्टिव्ह प्रॅक्टिस’ कंपनीच्या आर्किटेक्ट शिवानी शर्मा, देवेश चिंधे, कर्मचारी सय्यद मसूद अन्सारी, पहारेकरी दिनेश कोंडे, राखणदार सय्यद आजम यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी: सचिन जाधव
एनटीव्ही न्यूज मराठी, नांदेड