जालना: जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक १८ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कॅम्पस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राने ही भरती मोहीम आयोजित केली आहे.
या भरतीमध्ये बजाज ऑटो लिमिटेड, वाळूज (छत्रपती संभाजीनगर) आणि टाटा मोटर्स लिमिटेड, पुणे यांसारख्या नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत.
या कॅम्पस भरतीसाठी किमान १२ वी (कला, वाणिज्य, विज्ञान) किंवा आयटीआय (ITI) उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १६,८८० रुपये वेतन मिळेल. याव्यतिरिक्त, कंपनीतर्फे निवास आणि भोजनाची व्यवस्थाही केली जाणार आहे.
जाफराबाद परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. टी. देशमुख आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील यांनी परिसरातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी उपस्थित राहून आपल्या करिअरला उज्ज्वल दिशा द्यावी, असे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.