जाफराबाद, जालना – जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि ग्रीन क्लबच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव खासगाव येथे विशेष उपक्रम राबवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ आणि ‘एक पेड मॉ के नाम’ या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी खासगाव येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यासोबतच, ग्रामीण भागातील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेमुळे गावातील नागरिकांनाही स्वच्छतेची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाला खासगाव येथील ॲड. सागर लोखंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजी जगतवाड, प्रा. डॉ. प्रदीप मिसाळ, ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा. मनीष बनकर यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमामुळे महाविद्यालय आणि गावकऱ्यांमध्ये सलोख्याचे आणि सहकार्याचे संबंध अधिक दृढ झाले आहेत.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.